CoronaMaharashtraUpdate : रुग्णसंख्या कमी पण मृत्यूची संख्या चिंताजनक

मुंबई: गेल्या २४ तासात राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून दैनंदिन रुग्णसंख्येचा हा आणखी एक निचांक ठरला आहे. मात्र करोनाबाधितांच्या मृत्यूंचा वाढता आकडा ही चिंतेची बाब बनली असून आज एकाच दिवशी ९६० करोना बाधितांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ९६० मृतकांपैकी ३७१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४०१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीच आहेत. राज्यातील सध्याचा मृत्यू दर १.५१ टक्के इतका आहे.
राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे लक्षात येते की, राज्यात १५ एप्रिल ते १५ मे या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१ हजाक ६५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ या एक महिन्याच्या कालावधीत सरासरी दररोज ७२१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान आज राज्यात ५९, ०७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४७, ६७, ०५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८९.२ टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात ४, ९४, ०३२ सक्रिय रुग्ण आहेत.
करोनाची आजची स्थिती
– राज्यात आज ९६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– राज्यातील करोना मृत्यूदर सध्या १.५१ टक्के एवढा आहे.
– आज राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आजपर्यंत एकूण ४७ लाख ६७ हजार ५३ रुग्णांची करोनावर मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२ % एवढे झाले.
– आजपर्यंत ३ कोटी ८ लाख ३९ हजार ४०४ करोना चाचण्या पूर्ण.
– एकूण नमुन्यांपैकी ५३ लाख ४४ हजार ६३ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ३४ लाख ४७ हजार ६५३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत.
– २८ हजार ७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांच्या खाली
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांच्या खाली आली आहे. सध्या राज्यात ४ लाख ९४ हजार ३२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात सर्वाधिक ९३ हजार २४५ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात ३६ हजार ५६०, मुंबई पालिका क्षेत्रात ३४ हजार ८३, अहमदनगर जिल्ह्यात ३० हजार २२१ तर ठाणे जिल्ह्यात २९ हजार ६५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.