MaharashtraNewsUpdate : लॉकडाऊनबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई: राज्यातील करोना स्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत सर्वच मंत्र्यांनी आग्रह धरला. बैठकीनंतर तशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे त्यांनी स्पष्ट केले. लोकल प्रवासाबाबत सध्या जे निर्बंध आहेत ते १५ मे नंतरही कायम राहणार आहेत. त्यात कोणताही सवलत देण्याचा विचार नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचे चे लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचे लसीकऱण करणे गरजेचे असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले . त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये असेही त्यांनी सांगितले. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
टोपे पुढे म्हणाले की २० तारखेनंतर सिरमक़डून लसींचे अधिक डोस उपलब्ध होणार आहेत त्यामुळे त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेत.लॉकडाऊनबद्दल विचारले असता त्यांनी सध्याचा लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील. तसेच दोन दिवसांत याबद्दलची नियमावलीही जाहीर होईल असेही ते यावेळी म्हणाले.