PuneNewsUpdate : बेरोजगारीच्या नैराश्यातून आधी त्याने पत्नी आणि मुलाचा खून केला आणि स्वतःही केली आत्महत्या !!

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे ओढवलेल्या आर्थिक समस्यांमुळे अवघे कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. एका व्यक्तीने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केला. दोघांच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेऊन जीवनप्रवास संपवल्याची भयंकर घटना घडली आहे. लोणी काळभोर परिसरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत शिंदे या (वय ३८) व्यक्तीने पत्नी प्रज्ञा शिंदे (वय २८) आणि एक वर्षाचा मुलगा शिवतेज शिंदे या दोघांचा खून करून आत्महत्या केली आहे. हे कुटुंब लोणी काळभोरमधील कदम वाक वस्ती येथे वास्तव्याला होते. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात हनुमंत शिंदे पत्नी व मुलासोबत अनेक वर्षापासून राहत होता. गाडीवर चालक म्हणून काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. पण काम नसल्याने अनेक दिवसांपासून तो तणावात होता. याबाबत पत्नी प्रज्ञा यांनी हनुमंत यांच्या नातेवाईकांना सांगितले होते. पती हनुमंत शिंदे यांना समजून सांगण्याची विनंती त्यांनी नातेवाईकांकडे केली होती. पण, हि घटना घडलीच.
दरम्यान ९ मे रोजी सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास हनुमंत यांनी पत्नी प्रज्ञाचा गळा दाबून खून केला. तर एक वर्षाचा शिवतेज याचा सुरीने गळा कापला. त्यानंतर घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने हनुमंत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का? याचाही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.