MaharashtraNewsUpdate : कोरोनामुळे एप्रिल महिन्यात ५४ पोलिसांचा बळी

मुंबई : देशाच्या सुरक्षा दलांमध्ये मुंबई पोलिसांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत ११० मुंबई पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . तर महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ४२७ पोलिसांचे निधन झाले आहे. यापैकी ५४ जणांचा यंदाच्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भीषण रुप धारण केले असून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा जीव जात आहे. या काळातही मुंबईल पोलीस आपला जीव धोक्यात घालून शहातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. दरम्यान ड्युटीवर असताना कोरोनाची लागण होऊन अनेक पोलीस रुग्णालयांमध्ये दाखल होत असून यातील काही जणांना संसर्ग वाढल्याने जीव गमावण्याची वेळ येत आहे.
मुंबई पोलीस शहरात गस्त घालणे असो लसीकरण केंद्र असो किंवा मग क्वारंटाईन सेंटर असो अशा सर्व ठिकाणी आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत. यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे कामाचा ताण वाढल्यानं काही पोलिसांना रोज घरी देखील जाता येत नाहीय. लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आलीय त्यामुळे एप्रिल-मेच्या कडक उन्हात त्यांना पहारा द्यावा लागत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील सदस्याला पोलीस दलात नोकरी देण्याचं याधीच जाहीर केले होते . पण ही योजना देखील गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून मागे घेण्यात आली आहे.