MaharashtraNewsUpdate : वेदनादायक : तीन सख्ख्या भावाचा कोरोनाने घेतला बळी !!

कारेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात प्रचंड भीतीचे वातावरण असून दुःखद बातम्यांचा महापूर आला आहे . पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव याठिकाणी अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील तीन सख्ख्या भावाचा कोरोनाने बळी घेतला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अवघ्या 15 दिवसांत संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. या घटनेमुले गावात हळहळ व्यक्त केली जात असून पीडित कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि , कारेगाव येथील नवले मळ्यात राहाणाऱ्या नवले भावंडाना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तालुक्यातील विविध खाजगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . दरम्यान प्रकृती खालावल्याने तिन्ही भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला . त्यामुळे नवले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 23 एप्रिल रोजी सर्वात थोरला भाऊ पोपट नवले (वय-58) यांचे निधन झाले. दरम्यान थोरल्या भावाची मृत्यूची घटना ताजी असताना, अवघ्या चार दिवसांनी 27 एप्रिल रोजी मधला भाऊ सुभाष नवले (वय- 55) याचे निधन झाले . कोरोना विषाणूच्या या दुहेरी आघाताने नवले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे सर्वात धाकट्या भावाला वाचवण्याची धडपड सुरू झाली. पण 6 मे रोजी धाकटा भाऊ विलास नवले यांचेही निधन झाले . अवघ्या 15 दिवसांत तीन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कारेगावात शोककळा पसरली आहे.
शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या तिन्ही भावांचा अचानक कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं नवले कुटुंब पोरके झाले आहे. सर्वात मोठा भाऊ पोपट नवले यांच्या निधनांनतर, अन्य दोन भावांचा जीव वाचवण्यासाठी कारेगावकरांनी नवले कुटुंबाला मायेचा आधार दिला. तसेच इतर वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र नियतीपुढे त्यांनाही हार पत्करावी लागली.