CoronaIndiaUpdate : देशात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. शुक्रवारी हा आकडा चार लाखाच्या पार गेला होता. मात्र, आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील चोवीस तासात 3 लाख 8 हजार 522 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. पहिल्यांदाच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे झाले आहेत. तर, रुग्णसंख्येतही शुक्रवारच्या तुलनेत घट झाली आहे. या चोवीस तासांमध्ये 3,684 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान या आधी शुक्रवार कोरोना रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. शुक्रवारी एका दिवसात देशात 4 लाख 1 हजार 911 नवे रुग्ण आढळले होते. मागील चोवीस तासात जगभरात 8.66 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 46 टक्के रुग्ण एकट्या भारतातील आहेत. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. राज्यात शनिवारी कोरोनाचे 63,282 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, 802 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 46,65,472 वर पोहोचली आहे. यातील 69,615 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 62,919 नवीन रुग्ण समोर आले होते. तर, 828 जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबईमध्ये शनिवारी 3,897 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, 90 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मुंबईमधील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6,52,368 वर पोहोचली आहे. तर, 13,215 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं, की मागील चोवीस तासात राज्यात 61,326 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यानंतर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 39,90,302 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 6,63,758 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.