MaharashtraNewsUpdate : राज्यात पुन्हा 15 मे पर्यंत लॉकडाऊन

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यामुळे 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासाठी शासनाच्या वतीने नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या कठोर निर्बंधांच्या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे निर्बंध राज्यात 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
Maharashtra government extends current COVID19 restrictions till May 15 pic.twitter.com/TaE6hCJoIV
— ANI (@ANI) April 29, 2021
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचेही जाहीर करण्यात आलं आहे.
प्रवासाबाबत आहेत असे निर्बंध
बस सेवा वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपात्कालीन सेवेसाठी किंवा वैध कारणांसाठीच वापरता येईल. त्यासाठी चालक अधिक प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के ही कमाल मर्यादा असणार आहे. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासीवाहतूक अपेक्षित नाही तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादित राहील. जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्यकीय आपात्कालीन प्रसंग किंवा अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असल्यास अशा परिस्थितीत आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवासाला परवानगी दिली जाईल. या आदेशांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
प्रवाशांना 14 दिवस होम क्वॉरंटाइनचे स्टॅम्प
खासगी बसेसना केवळ 50 टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक करता येणार. बसमध्ये उभ्याने प्रवासाला बंदी करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान दोनपेक्षा अधिक थांबे घेता येणार नाहीत. थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस होम क्वॉरंटाइनचे स्टॅम्प मारले जाणार, असल्याचेही या नियमावलीमध्ये सांगण्यात आले आहे. जर एखाद्या प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याला त्या जिल्ह्यातील किंवा शहरातील कोरोना उपचार केंद्र किंवा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. प्रवासी उतरण्याच्या ठिकाणी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे उतरणाऱ्या प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारण्याच्या निर्बंधातून सूट द्यायची की नाही? हे स्थानिक प्रशासनाने त्या भागातील परिस्थितीनुसार ठरवायचे आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा राज्य परिवहनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती संबंधित प्रवासी उतरणार असलेल्या ठिकाणच्या प्रशासनाला द्यावी लागणार आहे. या सर्व प्रवाशांना 14 दिवसांचा होम क्वॉरंटाईनचा स्टॅम्प मारावा लागणार आहे. प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे स्कॅनिंग करून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागणार. या सर्व नियमांचे पालन करण्याचे किंवा ते शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.