CoronaVaccineUpdate : १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस

नवी दिल्ली : देशात 1 मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या आणि मोठ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर लसीकरणाला सुरुवात होण्याआधी केंद्राने राज्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याआधी अधिकाधिक खासगी केंद्राची नोंदणी करुन घेण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे. यासोबतच लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यास आणि योग्य व्यवस्थेबाबतही केंद्राने सल्ला दिला आहे.
याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, या वयोगटातील लोकांचे लसीकरण केवळ ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातूनच करण्यात यावे . 1 मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी राज्य सरकारांनी अधिकाधिक खासगी लसीकरण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे अधिक युवकांना कमीत कमी वेळात लस देणे शक्य होईल. दरम्यान कोविन पोर्टलच्या माध्यमातून लसीकरण केंद्र, लस घेतलेल्या लोकांची संख्या आणि नवीन नोंदणीवर लक्ष ठेवावे. 18-45 वयोगटादरम्यानच्या लोकांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीला प्राधान्य द्या. आधीप्रमाणेच आतादेखील लसीकरणासाठी आधार, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसनही मान्य केले जाईल.
याआधी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि कोरोनासोबत लढण्यासाठी बनवण्यात आलेल्या उच्च अधिकार असलेल्या समूहाचे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. सोबतच लसीची उपलब्धता आणि त्याच्या वाहतुकीबाबतही चर्चा झाली.