IndiaNewsUpdate : दुःखद : दिल्लीत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू , आणखी ६० रुग्णांचा जीव धोक्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर चालू असताना सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे रुग्णांचे प्राण जात आहेत. देशाच्या राजधानीत दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात गेल्या २४ तासांत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. तर गंभीर अवस्थेत असलेल्या ६० रुग्णांचा जीव धोक्यात आहे. रुग्णालयात अवघ्या दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा तातडीचा संदेश रुग्णालयाकडून प्रशासनाला पाठवण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे.
25 sickest patients have died in last 24 hrs at the hospital. Oxygen will last another 2 hrs. Ventilators & Bipap not working effectively. Need Oxygen to be airlifted urgently. Lives of another 60 sickest patients in peril: Director-Medical, Sir Ganga Ram Hospital, Delhi
— ANI (@ANI) April 23, 2021
रुग्णालयाच्या मेडिकल डिपार्टमेंटच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पुढच्या दोन तासांत उरलेला ऑक्सिजनही संपुष्टात येईल. व्हेन्टिलेटर आणि बायलेव्हल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर योग्य पद्धतीने काम करत नाही. रुग्णालयात आयसीयू आणि ईडीमध्ये मॅन्युअल पद्धतीने व्हेन्टिलेशन सुरू असल्याचे ही रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
या सर्व रुग्णांना ऑक्सिजनचा त्वरीत पुरवठा होण्यासाठी हवाई मार्गाने ऑक्सिजन पोहचवण्याची आवश्यकता आहे. दरम्यान वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही तर आणखी ६० रुग्णांचा जीव धोक्यात असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.