IndiaNewsUpdate : अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पश्चिम बंगला निवडणूक प्रचार दौरा रद्द

नवी दिल्ली : अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजचा निवडणुक प्रचाराचा आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द केला आहे. देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या उच्चस्तरीय बैठक आयोजित केली असल्याने हा दौरा रद्द केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते.
Tomorrow, will be chairing high-level meetings to review the prevailing COVID-19 situation. Due to that, I would not be going to West Bengal.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2021
विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी , पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले निवडणूक दौरे आणि प्रचार दौरे आधीच रद्द केले आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आपले प्रचार दौरे रद्द करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देशातील ऑक्सिजन आणि कोरोनाविषयक औषधांची टंचाई निर्माण झाल्याने या विषयी सरकारच्या काय योजना आहेत ? अशी विचारणा केल्यानंतर केंद्र सरकार कामाला लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकांचा धडाका सुरु केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. देशातल्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दिल्लीबरोबरच अन्य काही राज्यांनी ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचं सांगितलं आहे. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेशही दिले आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक राज्यांना भासत असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेच्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी ऑक्सिजनचे उत्पादन वाढवणे , त्याच्या वितरणाचा वेग वाढवणं आणि त्याचा पुरवठा निश्चित करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये पाच टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आहेत. आज निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. २६ एप्रिलला, सातव्या टप्प्यात ५ जिल्ह्यातल्या ३६ जागांसाठी मतदान होईल. तर आठव्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला होणार आहे.