MaharashtraNewsUpdate : राज्यात आता ७ ते ११ पर्यंतच खुली सूट, बाकी कडक संचारबंदी

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत असल्याने, राज्या शासनाने निर्बंध कडक करत १५ दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. मात्र निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर घराबाहेर फिरत असल्याने, आता किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते १ ऐवजी आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज (सोमवार) घेण्यात आला आहे.
राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हीसीद्वारे), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.