MaharashtraNewsUpdate : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचा इशारा

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मंत्र विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनच्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया दिली आहे . त्यांनी म्हटले आहे की, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करत आहेत. मात्र मला दोन आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा वाटत आहे. तसेच राज्यात कडक लॉकडाऊन न केल्यास आणि लोक भीती न बाळगता घराबाहेर पडत राहिल्यास राज्यात मृत्यूंचा खच पडेल. विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
आरोग्य यंत्रणेसमोर वाढत्या रुग्णवाढीमुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या फैलावाला ब्रेक लावण्यासाठी कडक लॉकडाऊन शिवाय अन्य पर्याय नाही.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहे. रविवारी राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी महाराष्ट्रात ६३ हजार २९४ कोरोनाचे रुग्ण सापडले होते. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ०७ हजार २४५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
राज्याबरोबरच देशातही कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे तब्बल १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण सापडले आहेत. तर ७५ हजार ८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.