AurangabadCrimeUpdate : क्रौर्याची परिसीमा , लुटमारीच्या प्रयत्नात मरेपर्यंत वार करीत अपंग तरुणाचा हातच तोडून फेकला !!

बँकेच्या परीक्षेला आलेल्या दिव्यांग तरुणाची हत्या करणारा ट्रॅव्हल एजंट अटकेत
परीक्षा केंद्रावर सोडतो म्हणत लुटण्याचा प्रयत्न । विरोध केल्याने चाकूने केले वार
घराच्या पत्र्यावर फेकला विकासचा हात
औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी परवा एक भयानक घटना घडली ! अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील अल्हनवाडीचा विकास देवचंद चव्हाण हा अपंग तरुण मोठं स्वप्न घेऊन, भारतीय रिझर्व बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबाद शहरात आला होता . पण परीक्षा देण्याच्या आधीच शुक्रवारी ९ एप्रिल रोजी सकाळी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अतिशय शिताफीने तपास करून सिटीचौक पोलिसांनी संशयित ट्रॅव्हल एजंट शाहरुख खान फिरोज खान (२८, रा. जुना बाजार) याला रात्री ताब्यात घेतले. त्याने विकासला लुटण्याच्या इराद्याने परीक्षा केंद्रावर दुचाकीने सोडण्याचे आमिष दाखवले. त्याला दुचाकीवर बसवून कब्रस्तानात नेले. दरम्यान लुटमारीचा प्रयत्न करताना विकासने त्याला विरोध केला होता. त्यामुळे शाहरुखने चाकुने विकासावर वार करुन हत्या केल्याची कबुली दिली.
त्याचे असे झाले कि , पाथर्डीहून औरंगाबादला बँकेच्या परीक्षेसाठी विकास नावाचा तरुण गुरुवारी ८ एप्रिल रोजी रात्री आला होता. मात्र शहरात कुणीही नातेवाईक नसल्याने तो मध्यवर्ती बसस्थानकावरच झोपी गेला. शुक्रवारी ९ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता चिकलठाण्यातील आयआॅन सेंटरमध्ये परीक्षा असल्याने तो पहाटेच झोपेतून उठला. मात्र, पहाटे पाचच्या सुमारास त्याला शाहरुखने दिव्यांग असल्याचे पाहून हेरले. बराचवेळ विकास सोबत गप्पा मारुन शाहरुखने विश्वास संपादन केला. लॉकडाऊन असल्यामुळे परीक्षा केंद्रावर सोडतो असे म्हणून शाहरुखने त्याला बसस्थानकाच्या आवारातूनच दुचाकीवर बसवले. विकासला लुटण्याच्या उद्देशाने शाहरुखने त्याला दुचाकीवर बसवून कार्तिकी सिग्नल, अंजली थिएटर, खडकेश्वर या मार्गे मनपा जवळ चिताखाना कब्रस्तानात नेले. तेथे विकासला लुटण्याचा प्रयत्न करुन मारहाण केली. विकासने विरोध करताच शाहरुखने धारधार चाकुने विकासच्या गळ्यावर व नंतर पोटावर सपासप वार केला. एवढ्यावरच न थांबता विकासने विरोध केला. म्हणून शाहरुखने त्याचा अधू असलेला उजवा हात कापला. त्यानंतर शाहरुख तेथून निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार दाखल झाले. पोलिसांनी आठ ठिकाणचे सीसी टिव्ही फुटेज तपासत शाहरुखला काही तासातच ताब्यात घेतले. शाहरुखच्या खिशात पोलिसांना विकासचे पाकिट सापडले. त्यात आधार कार्ड व इतर कागदपत्रे देखील होती. शिवाय विकासचे पाचशे रुपये लुटल्याची देखील त्याने कबुली दिली. शाहरुख हा नशेखोर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
घराच्या पत्र्यावर फेकला विकासचा हात…..
शाहरुखने कापलेला विकासचा हात आज शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नई बस्तीमधील शेख अब्दुल करीम यांच्या घराच्या पत्र्यावर आढळला. त्यावेळी एक मांजर त्याचा हात चाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन सिटीचौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, संजय नंद, संदीप तायडे, देशराज मोरे, अभिजीत गायकवाड व माजीद पटेल यांनी विकासचा हात जप्त केला. विकासचा हात सध्या घाटीच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. तो डीएनए चाचणीसाठी प्रयोग शाळेत व त्यानंतर चव्हाण कुटुंबियांना पुढील संस्कारासाठी देण्यात येणार असल्याचे निरीक्षक पवार यांनी सांगितले.
पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस…..
विकासची हत्या करणा-या शाहरुखला काही तासात सिटीचौक पोलिसांनी अटक केली. त्याचा तोडलेला हात देखील जप्त केला. त्यामुळे पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी सिटीचौक पोलिसांना दहा हजारांचे रिवॉर्ड जाहीर केले आहे.