NandedNewsUpdate : देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले,मृत्यूसमयी ते 60 वर्षाचे होते.काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आमदार अमरनाथ राजूरकर यांनी यांनी हि माहिती दिली.
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना 22 दिवसांपूर्वी कोरोना झाला होता.त्यानंतर त्यांना मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकली नाही. निमोनिया झाल्याने दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या.मागच्या काही दिवसांपासून उपचारास ही फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.
शुक्रवारी सकाळपासून ऑक्सिजन शून्यावर आला होता.केवळ हृदय ठोके सुरू होते.त्यामुळे प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त धडकले होते.मात्र निधनाची घटना ही अफवा असल्याचे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.दुसरीकडे राज्यातील विविध पक्षाच्या तमाम नेत्यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारे ट्विट केले होते.शुक्रवारच्या रात्री अंतापूरकर यांचे निधन झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.अंतापूरकर हे दुसऱ्यांदा आमदार बनले होते.यापूर्वी ते 2009 ते 2014 साली आमदार होते. 2014 साली त्यांचा पराभव झाला होता.मात्र 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून विजयी झाले होते.