#MaharashtraLockdownUpdate : राज्याची कडक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल

राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांसह वीकेण्ड लॉकडाउन जाहीर केला असला तरी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान उद्या या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे.
एनडीटीव्हीशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे कि , जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करेल असा इशारा पुन्हा एकदा दिला असून आपण लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहोत, पण तो करावा लागू नये अशी अपेक्षा आहे. जर त्याआधी आपण कोरोनाला रोखले तर आम्ही आनंदी आणि समाधानी असू. आम्ही सर्वोत्तम होईल अशी अपेक्षा करत आहोत. पण जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होऊ लागते, डॉक्टरांची कमतरता जाणवू लागते, औषधांचा तुटवडा निर्माण होतो आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो तेव्हा तात्काळ लॉकडाऊन जाहीर करणे हा नियम आहे. जेणेकरुन आपण सुविधा निर्माण करुन परिस्थितीचा सामना करु शकतो. कोरोनाची साखळी तोडणे हा लॉकडाऊनचा मुख्य हेतू असतो. जगभरात आपण पाहिले तर १५ दिवस ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन हा गरजेचा असून त्याचे कडक पालन झाले पाहिजे. त्यानंतर त्या कालावधीचा फायदा होतो.
विजय वडेट्टीवारांकडून तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची मागणी
दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले आहेत. विकेण्ड लॉकडाऊनची आवश्यकता होती. रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात १० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत भविष्यात पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठेही होणार नाही हे पहावं लागेल.
दरम्यान ते म्हणाले की, परिस्थिती हाताळण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. साडे पाच हजार डॉक्टर जे आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना ठिकठिकाणी कामाला लावत होतो, तरीदेखील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे वीकेण्ड नाही तर मी मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्यास सांगणार आहे. कडक लॉकडाऊन केल्याशिवाय निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. करोनाचा प्रसार झालेला असून अशा परिस्थितीत पूर्णत: लॉकडाऊनची आवश्यकता असून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे.
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई लोकल प्रवासावर निर्बंध आणण्याचेही संकेत दिले. लोकल प्रवासासाठी काही वेळा ठरवून द्याव्या लागतील. आरोग्य यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा द्यायला पाहिजे. त्यामुळे आता गेल्यावेळप्रमाणे लोकल प्रवासाचे नवे धोरण आखण्याची गरज, असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.