IndiaNewsUpdate : आरबीआयचे पत धोरण जाहीर , व्याजदरात कोणतेही बदल नाहीत : शक्तिकांता दास

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या तीन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज पतधोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय आयबीआयने घेतला असून, व्याजदर कायम राहणार आहेत. त्यामुळे कर्जदारांवरील ईएमआयचा भार वाढला नसला, तरी दिलासाही मिळालेला नाही.
राष्ट्रीय पतधोरण आढावा समितीची सोमवारपासून बैठक सुरू होती. आज बैठक संपल्यानंतर शक्तिकांता दास यांनी पतधोरण जाहीर केले आहे. “करोनाचे संक्रमण वाढत असले तरी अर्थव्यवस्थेत सुधारणा होताना दिसत आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढल्याने अनिश्चिततेतही भर पडली आहे. असे असले तरी भारत आव्हानांवर मात करण्यासाठी तयार आहे. फेब्रुवारीमध्ये महागाई दर ५ टक्क्यांवर होता,” असे शक्तिकांता दास यांनी सांगितले. दरम्यान पतधोरण आढावा समितीने रेपो रेट ४ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेटही ३.३५ टक्केच निश्चित करण्यात आला आहे.
RBI keeps repo rate unchanged at 4%, maintains accommodative stance; Reverse repo rate stands at 3.35% pic.twitter.com/Nm9Lbxd8DH
— ANI (@ANI) April 7, 2021
दरम्यान आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारच्या २४ तासांत ९६ हजार ९८२ करोनाबाधित रुग्णांची भर पडलीय. याच दिवशी तब्बल ५० हजार १४३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ४४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याबाबत बँकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली. नव्याने लागू होणारे निर्बंध विकासाला बाधक ठरतील, असे दास यांनी सांगितले. महागाई वाढीवर देखील आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. २०२१ च्या चौथ्या तिमाहीत महागाई दर ५ टक्के राहील तर २०२१-२२ च्या पहिल्या समाहित विकास दर ४.४ टक्के राहील तर तिसऱ्या तिमाहीत तो ५.१ टक्के राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. विकासाला चालना देण्याच्या उपायोजना बँकेकडून केल्या जातील आणि तसे पतधोरण असेल, असे दास यांनी यावेळी स्पष्ट केले.