सिल्व्हर ओकवर राजकीय हालचालींना वेग

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्राद्वारे लावलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. यामुळे मुंबईतील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर राजकीय नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे.
उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देताचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्ली गाठली आहे. याठिकाणी त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू संघवी यांची भेट घेतली असून तब्बल एक तास चर्चा केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक संघवी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी जाऊन बैठका घेतल्या आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर राजकीय नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार याठिकाणी दाखल झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसोबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही याठिकाणी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.