AurangabadNewsUpdate : रेकी ग्रँड मास्टर अनिलभाऊ तायडे यांचे निधन

औरंगाबाद : रेकी ग्रँड मास्टर अनिलभाऊ तायडे, रा. नाथपुरम , वय ७३, यांचे अल्पशा आजाराने रात्री ८.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवाववार गोलवाडी स्मशानभूमीत कोरोनाविषयक नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकजनशक्ती पार्टीच्या महाराष्ट्र संसदीय मंडळाचे अनिलभाऊ ज्येष्ठ सदस्य होते. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे ते निकटवर्तीय होते. मूळचे अकोल्याचे असलेले अनिलभाऊ औरंगाबाद शहरात स्थायिक झाले होते. एस. अँड एस . असोसिएट या फर्मचे ते संचालक होते मात्र 1998 पासून ते रेकी ग्रँड मास्टर आणि वज्रयान साधक होते. रेल्वे स्टेशन परिसरात त्यांनी चालू केलेल्या रेकी केंद्राच्या माध्यमातून त्यांनी हजारो साधक रेकी मास्टर्स , रेकी हिलर्स , रेकी चॅनल तयार केले होते. औरंगाबाद शहरात त्यांनी वज्रयानाच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
रेकीच्या माध्यमातून त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती के . आर . नारायणन यांच्यावरही नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी उपचार केले होते. या सुखद अनुभवामुळे औरंगाबाद दौऱ्याच्या वेळी के . आर . नारायणन त्यांच्या नाथपुरम येथील निवासस्थानी आवर्जून भेट देण्यासाठी गेले होते. “गुरुजी” म्हणून ते त्यांना संबोधित होते. रेकीच्या उपचारामुळे बरे झाल्याच्या आनंदात त्यांनी अनिलभाऊ यांना सुंदर बुद्धमूर्ती भेट दिली होती. बुद्धावर त्यांचा मोठा अभ्यास होता. महानायक परिवार तायडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.