CoronaIndiaUpdate : देशात 89,129 नव्या रुग्णांची नोंद तर 714 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासात देशात 89,129 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, चिंताजनक बाब म्हणजेच मृतांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील चोवीस तासात 714 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वर्षातील मृत रुग्णांच्या संख्येनं गाठलेला नवा उच्चांक आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,23,92,260 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,64,110 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहात लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग देण्यात आला आहे. गुरुवारपासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मागील चोवीस तासात 3093795 जणांना कोरोना लस दिली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरुन स्पष्ट झाली आहे.
देशात सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातील परिस्थिती आणखीच गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेसोबत संवादही साधला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे, पुढील काही दिवस राज्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. राज्यात विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात पुन्हा एकदा दिवसभरात उच्चांकी 9086 कोरोना रूग्णवाढ झाली आहे. त्याशिवाय मृतांची संख्या 58 वर पोहोचली आहे.