MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : पुण्याचं ठरलं : मुख्यमंत्री आज रात्री राज्यातील जनतेला बोलणार…

मुंबई । पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरात लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. दोन आठवड्यांसाठी पुणे शहरातील सर्व हॉटेल आणि मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्री आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार असल्याचे वृत्त आहे. आपल्या संबोधनात ते संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करतात कि त्या ऐवजी काही प्रमाणात निर्बंध कठोर करतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढवणे, तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेणे, लसीकरण वाढवणे असे काही प्रमुख अजेंडे हाती घेऊन त्यावर राज्य सरकार अधिक काम करण्याचा निर्णय घेईल, अशी माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका जाहीर करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यात अखेर निर्णय झाला , लागू झाले असे निर्बंध
‘पुण्यात लॉकडाऊन करू नये, अशी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात येणार नाही. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात येणार आहेत,’ अशी भूमिका अजित पवार यांनी या बैठकीत घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पुण्यातील गर्दी टाळण्यासाटी पीएमपी बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला पुणे शहराचे खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांचा विरोध होता. मात्र शहरात वेगाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला. उद्यापासून नवे सर्व निर्णय लागू होणार आहेत.
पुण्यात काय सुरू, काय बंद; जाणून घ्या नवे नियम
– शाळा कॉलेज 30 एप्रिलपर्यंत बंद
– दहावी बारावीच्या नियोजित परीक्षा होणार
– हॉटेल मॉल दोन आठवड्यांसाठी बंद, पण होम डिलिव्हरी सुरू राहील
– ससून रुग्णालय क्षमता 500 बेडने वाढवणार
– सर्व धार्मिक स्थळ 7 दिवस बंद राहणार
– औद्योगिक कंपन्या सुरू राहतील
– आठवडे बाजार बंद
पुण्यात चिंताजनक स्थिती
पुणे शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. दिवसाला 4 हजारांहून अधिक बधितांची नोंद होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. डब्लिंग रेट सुद्धा 49 दिवसांवर आला आहे. तर मृत्यू दर 1.95 टक्क्यांवर आहे. शहरात 35 हजार 849 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच बरे होण्याचं प्रमाण 85 टक्क्यांवर आले आहे.