MarathawadaCoronaUpdate : धक्कादायक : नांदेड शहरात अंत्यसंस्कारालाही लागल्या रांगा !!

नांदेड : रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत कोरोनाने सर्वत्र कहर केला असून नांदेडमध्ये आज भयावह चित्र दिसले. नांदेड शहर 13 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा अंत्यविधी शहरातील गोवर्धन घाट स्मशानभूमीत करण्यात आला. त्यासाठी गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अक्षरशः रांग लागली होती. त्यामुळे स्मशानभूमीच्या गेटपासून सरण रचून अंत्यसंस्कार करावे लागले.
कोरोनामुळे नांदेड जिल्ह्यात गेल्या 7 दिवसात 56 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 683 मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र, सोबत पोलिसांची एनओसी आल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. महापालिकेच्या कर्मचा-यांकडून सर्व खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवर ताण आला आहे. नांदेडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठया संख्येने वाढत आहेत. मृतांची संख्या देखील वाढत आहे.
अशात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नियमानुसार महापालिका किंवा स्थानिक स्वराज संस्थेची असते. तेव्हा शहरातील सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात रुग्ण दगावला तर महापालिकेकडून अंत्यविधी केला जातो. शहरातील गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. पण स्मशानभूमीत लोखंडी दाहवाहिनी आहेत. त्यांची संख्या सात आहे. विद्युत दाहवाहिनी इथे नाही. एका लोखंडी दाहवाहिनीवर 10 ते 24 तासात फक्त एका मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. नंतर अस्थि संकलनासाठी किमान 10 तासाचा अवधी लागतो. दाहवाहिनी कमी आणि मृतांची संख्या जास्त असल्याने आता नांदेडमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील रांग लावावी लागत आहे. कोरोनाशिवाय अन्य आजार आणि नैसर्गिक मृत्यू देखील होत आहेत. अशात अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.