AurangabadCoronaUpdate : लॉकडाऊनच्या धास्तीने औरंगाबादेत उसळली तोबा गर्दी , पोलिसही झाले हतबल !!

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दररोज दिड हजारांवर रुग्ण निघत असल्याने प्रशासनाबरोबरच लोकही भयभीत झाले असून लॉकडाऊन धास्तीने औरंगाबादकरांनी आज सायंकाळी शहरात प्रचंड गर्दी केल्याचे भयावह चित्र दिसले. दरम्यान या गर्दीवर कसे नियंत्रण मिळवावे या चिंतेने पोलिसही लोकांपुढे हतबल झाले आहेत. दरम्यान या गर्दीत कोण कोरोना पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह समजणे अवघड झाले आहे .
सध्या सौम्य लक्षणे असणारे ३७८५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र खरोखर हे रुग्ण चार भिंतीच्या आत आहेत का? हे पाहण्याची जबाबदारी असलेले पथक याठिकाणी कुठेही फिरतांना दिसून येत नाही. दरम्यान अनेक होम आयसोलेटेड पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः बाहेर फिरत जीवनावश्यक वस्तू, औषधी खरेदी करतांना दिसतात. यांच्यावर कोणाचाही आणि कुठलाही अंकुश नाही. तसेच कोणाच्याही घरावर ‘इथे कोरोना रुग्ण आहे’ अशी पाटी नाही अशी पाटी लावण्यात येणार आहे असे मनपा आयुक्त यांनी जाहीर केले होते. तर हातावर होम क्वारन्टाईनचा शिक्का देखील मारला जात नाही. वर्षभरा पुर्वी पहिल्या लाटेत असे शिक्के मारले जात होते. त्यामुळेच पॉझिटिव्ह रुग्ण ओळखायचा कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गतवर्षी कोरोनाच्या सुरुवातीला रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल महापालिकेकडे येताच त्या त्या भागातील आरोग्य केंद्राद्वारे रुग्णाच्या घरापर्यंत कर्मचारी पोहोचत असे. त्यानंतर अँब्युलन्स, स्मार्ट सिटी बस यातून रुग्णांना सरळ कोविड सेंटर अथवा आवश्यकतेनुसार घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय याठिकाणी नेले जात असे. मात्र आता पॉझिटिव्ह आल्याचे कळल्यानंतर रुग्ण स्वतःला कोविड सेंटर कडे जात आहेत. तर काही रूग्णाला खाटा शिल्लक नसल्याचे कारण सांगत घरीच होमकाँरंटाईन होण्याचा सल्ला दिला जातो आहे. परंतु त्यांच्या हातावर शिक्का मारला जात नाही.
ज्यांच्याकडे होम आयसोलेशनसाठी सुविधा आहे अशांना होम आयसोलेट केले जाते. मात्र त्यानंतर होम आयसोलेशन सर्टिफिकेट साठी इतर तसेच इतर गोष्टींच्या पूर्ततेसाठी अनेक रुग्णांना मनपाद्वारे कुठल्याही प्रकारे संपर्क केला जात नसल्याचे समजते. त्यामुळे या होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर अंकुश ठेवणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फक्त पहिल्या दिवशी केली विचारपूस
पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारलेल्या शहरातील एका रुग्णास महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पहिल्या दिवशी संपर्क केला. कुठे उपचार घेत आहात? इत्यादी बाबी विचारल्या. त्यानंतर गेले चार ते पाच दिवस उलटले मात्र महापालिकेकडून पुन्हा चौकशी करण्यात आलेली नाही. यासारखीच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या इतर रुग्णांची परिस्थिती आहे.