MarathawadaNewsUpdate : 5 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार , हत्या प्रकरणात सालगाड्याला फाशीची शिक्षा

नांदेड | नांदेड जिल्ह्यात 5 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला भोकर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या 64 दिवसात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 19 दिवसात आरोपपत्र दाखल केले होते.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी या गावात 20 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. 35 वर्षीय आरोपी बाबू संगेराव हा मयत मुलीच्या शेतात सालगडी होता. घटनेच्या दिवशी दुपारी चार वाजेच्या सुमारास आरोपीने मुलीला घरी नेण्याच्या बहाण्याने शेतातून घेऊन गेला. परंतु नंतर तो घरी न जाता त्याने शेताच्या शेजारीच असणाऱ्या झुडुपात नेऊन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला.
या घटनेनंतर मोठी शोधाशोध केल्यानंतर कुटुंबीयांना रात्री मुलीचा मुतदेह आढळला. थोड्या अंतरावर आरोपी देखील नग्न अवस्थेत गावकऱ्याना आढळून आला. गावकऱ्यांना आरोपीला तिथेच चांगला चोप दिला. पोलीस गावात पोहोचले आणि त्यांनी आरोपीला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले. 19 दिवसात तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर 40 दिवसात सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
या खटल्यात न्यायालयाने 15 साक्षीदार तपासले. मयत मुलीच्या अंगावर 47 जखमा होते. आरोपीने अत्यंत निर्घृणपणे तिचे लचके तोडले होते. ही घटना दुर्मिळ असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं आणि आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीला लवकर शिक्षा मिळाल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.