MaharashtraCoronaUpdate : लॉकडाऊन पेक्षाही कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाचाअसा आहे नवा उपाय

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर कमी होत नसला तरी आजवरचा अनुभव लक्षात न घेता कडक लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा मार्ग नसल्याचे मान्य करून राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या कडक मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. यानुसार यापुढे राज्यातील सर्व नियमावलीनुसार कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या 15 हजारांहून अधिक आढळत असल्याने शासनाच्या नव्या नियमावलीचे पालन न केल्यास राज्य सरकारने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
असे आहेत नवे निर्बंध
१. राज्यातील सर्व उपहारगृहे , थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले असून सर्वांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आस्थापनांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायजर लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना महासाथ जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही गाईडलाइन्समध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.
२. राज्यातील शॉपिंग मॉल्सनाही हेच नियम लागू राहतील.
३. राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
४. महत्वाचे म्हणजे शासनाने लग्न समारंभासाठी फक्त ५० लोकांना परवानगी असेल तर अत्यंसंस्कारात २० पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही असे आदेशित केले आहे.
५. आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीचे कर्मचारी वगळता अन्य क्षेत्रातल्या कंपन्यांनी एका वेळी ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच ऑफिसला बोलवावे , असे या नव्या कोरोना नियमांमध्ये बजावले आहे. अन्य कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे . या नियमांचे पालक केलं गेले नाही तर संबंधित आस्थापना covid-19 ची साथ आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येऊ शकते, असा कडक आदेश यामध्ये आहे. किमान ३१ मार्चपर्यंत राज्य सरकारची सगळी कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू राहतील.
६. याशिवाय मंदिर, धार्मिक स्थळे आणि अन्य प्रार्थनास्थळांमध्ये जागेनुसार एका वेळी किती लोकांना प्रवेश द्यावा हे निश्चित करण्यात यावे , असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. शक्यतो ऑनलाइन दर्शन, रजिस्ट्रेशन करूनच दर्शन घ्यायची सोय करावी. कुठल्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता कुठल्याही स्थळी गर्दी होणार नाही याची दक्षता विश्वस्तांनी घ्यावी, अशी ताकीद देण्यात आली आहे.
७. धार्मिक स्थळांवरही मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास थेट दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.