IndiaNewsUpdate : लग्नघटिका संपवून सासरी जाणाऱ्या नववधूचा हृदयद्रावक अंत !!

भुवनेश्वर : विवाहानंतर सासरी जाणाऱ्या वधूला माहेरच्यांना सोडण्याचा शोक इतका अनावर झाला कि , ओडिशात एका नववधूचा हृदय विकाराच्या अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते.
याबाबत इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशाच्या सोनेपूर जिल्ह्यातील ही घटना असून गुप्तेश्वरी साहू उर्फ रोझी असे नवरीचे नाव आहे. शुक्रवारी बालानगीर इथे राहणाऱ्या बिसीकेसन याच्यासोबत रोझीचे लग्न झाले. दरम्यान विववाहानंतर सासरी जाण्याची वेळ आल्यानंतर रोझीला इतके रडू अनावर झाले कि रडत रडतच बेशुद्ध होऊन ती जमिनीवर कोसळली. लगेचच नातेवाईकांनी तिच्याकडे धाव घेतली आणि तिच्या हाताची मालिश व तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले . शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. इंडिया टुडेसोबत बोलताना गावातील एका व्यक्तीने सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच रोझीच्या वडिलांचे निधन झाले होते , त्यामुळे ती तणावात होती. तिच्या काही नातलगांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचे लग्न लावून दिले होते. पण, सुखी आयुष्याची सुरुवात होण्याआधीच तिची प्राणज्योत मालवली . तिच्या अशा जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.