MarathwadaNewsUpdate : घोड्यावर बसण्याआधीच या अधिकाऱ्याने घोड्याचा नाद सोडून दिला !!

नांदेडमधील एका अधिकाऱ्याने कार्यालयात घोड्यावर येण्याची आणि जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात घोडा बांधण्याची परवानगी मागणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच सायंकाळ होईपर्यंत आपली मागणी मागे घेत, माफीनामा सादर केला आहे. सहायक लेखाधिकारी (रोहयो) सतीश पंजाबराव देशमुख यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते. त्यात पाठीच्या दुखण्यामुळे वेळेत कार्यालयात येण्यासाठी घोडा खरेदीची व त्याला बांधण्याची परवानगी मागितली होती.
यानंतर हे पत्र समाज माध्यमावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. देशमुख यांच्या मागणीवर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागवला गेला. अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय दिला. तो अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला.यानंतर या सतीश देशमुख यांनी त्यांची मागणी मागे घेत माफीनामा सादर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आणि घोड्यावर बसण्याआधीच या अधिकाऱ्याने घोड्याचा नाद सोडून दिला.
*छायाचित्र : माजी मंत्री राजेंद्रबाबू दर्डा यांच्या फेसबुक वॉलवरून साभार