AurangabadNewsUpdate : अल्पवयीन मुलीचा अत्याचारानंतर खून , गंगाखेड न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा खंडपीठात रद्द

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केलेल्या प्रकरणातील पोलिस तपास व सरकारी पक्षाच्या कामकाजावर न्या. रविंद्र घुगे आणि न्या. बी.यू.देबडवार यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. सरकारी पक्षातर्फे सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरुन गुन्हा केवळ याच आरोपीने केला आहे, हे सिद्ध होत नाही. संशयाआधारे आरोपीला शिक्षा ठोठावणे चुकीचे आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले व संशयाचा फायदा देत आरोपी विष्णु मदन गोरे याला गंगाखेड सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द केली आणि संशयाचा फायदा देत त्याची निर्दोष मुक्तता केली.
हा तर असंवेदनशीलतेचा कळस
अभियोग पक्षाने ज्या पद्धतीने या गुह्याचा तपास केला. साक्ष-पुरावे गोळा केले आणि सत्र न्यायालयात खटला चालविला, हा सर्व प्रकार
अंसवेदनशील असल्याचे मत खंडपीठाने नोंदविले. ज्या नॉयलॉनच्या दोरीचा गुह्यात वापर करण्यात आला होता, ती दोरी फाॅरेन्सिक लॅब कडे तपासण्यासाठी दिलीच गेली नसल्याचे खंडपीठाच्या निर्दशनास आले आहे.तसेच न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतून माहिती गोळा करण्याची तसदी घेण्यात आली नाही. साक्षीदाराने(क्रं.२३) आई, बहिण आणि सूनेची साक्ष नोंदविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली, मात्र पुढे काहीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे खंडपीठाने नमुद केले. तसेच राज्य अभियोग संचालनालयाच्या प्रमुखांना या सर्व प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांविरोधात कार्यवाही करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.
काय आहे प्रकरण ?
सोनपेठ तालुक्यातील पाच वर्षाची मुलगी २७ आॅक्टोबर २०१६ रोजी बेपत्ता झाली होती. ३१ आॅगस्ट रोजी गावाशेजारील एका विहिरीत तिचा मृतदेह आढळला होता. मुलीच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा खून करुन प्रेत विहिरीत फेकून दिल्याचे तपास उघड झाले. आरोपीविरोधात खून,पळवून नेणे, आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याआधारे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.