MumbaiNewsUpdate : कोरोना डोस घेतलेल्या व्यक्तीच्या निधनाने खळबळ

मुंबई । राज्यात सर्वत्र कोरोना लसीकरणाची मोहीम चालू असताना दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या इसमाला लसीकरण केंद्रातच चक्कर आल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना भिवंडीतील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात मंगळवारी घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत्यूचे नेमकी कारण अजूनही समजले नसल्याने आरोग्य विभागात देखील मोठी खळबळ उडाली आहे.
सुखदेव किर्दत ( वय ४५ ) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून ते ठाणे येथील मनोरमा नगर येथील रहिवासी असून भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहन चालक म्हणून काम करत होते . मंगळवारी सकाळी ११ वाजता ते कोवीड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील भाग्यनगर येथील कोवीड लसीकरण केंद्रात गेले असता दुसरा डोस घेतल्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षा गृहात थांबले होते . त्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले त्यांना उपचारासाठी भिवंडीतील इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात नेले असता येथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे .
दरम्यान लस घेतल्यानंतर या इसमाचा मृत्यू नेमकी कोणत्या कारणाने झाला याबाबत शव विच्छेदन अहवाल आल्या नंतर माहिती मिळेल त्यासाठी ठाणे आरोग्य विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक देखील भिवंडीत दाखल झाले असून शवविच्छदन अहवालानंतरच नेमके कारण समजेल अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ . के. आर. खरात यांनी दिली आहे . सुखदेव किर्दत यांच्या अगोदर इतर सात जणांना देखील डोस देण्यात आले ते सर्व व्यवस्थित असून ऑब्झर्वेशन कक्षात किर्दत बसले असता त्यांना चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले अशी माहिती लसीकरण केंद्रात कर्तव्यावर असलेल्या सुगंधा कांबळे , समिधा पाईकराव , पूनम ठाकरे या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली आहे .
दरम्यान माझे पती आज दुसरा डोस घेणार असल्याची माहिती सकाळी मला माझ्या पतीने दिली होती , नेहमीप्रमाणे आज ते कामावर देखील गेले , मात्र दुपारी मला त्यांचा अपघात झाला असल्याचा फोन आल्याने मी आयजीएम रुग्णालयात आले असता पतीच्या निधनाची बातमी समजली , या घटनेने मला धक्काच बसला असून या घटनेची सखोल चौकशी व्हावी व मला न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया मयत सुखदेव किर्दत यांची पत्नी सोनाली किर्दत यांनी दिली आहे.