विधानसभा अधिवेशन : …आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपच्या गोंधळी आमदारांना असे शांत केले !!

मुंबई | राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवसही विरोधी पक्षाच्या आमदारांच्या गदरोळाने विधानसभा परिसर आणि सभागृह दणाणून गेले. विरोधी आमदारांनी हातात सरकारविरोधी फलकासह सोबत कृषी पंप आणि वीज कनेक्शन तोडलेले वीज मीटर आणले होते. आज दिवसभर अधिवेशनात वीजबील दरवाढीवर गदारोळ होणार हे लक्षात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे अवघ्या काही सेकंदातच उभे राहून “विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडणार नाही”, असा निर्णय जाहीर करताच घोषणाबाजी थांबली.
शेतकऱ्यांच्या वीजबिलांच्या मागणीवर विरोधक आक्रमक होणार आणि गोंधळ घालणार याची सरकारला पूर्वकल्पना असल्याने त्या सर्व आरोपांची आणि विरोधी पक्षांच्या तयारीची हवाच जणू अजित पवार यांनी काढून घेतली त्यामुळे दिवसभर गदारोळ घालण्याच्या तयारीत आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना आता पुढे काय करायचं हा प्रश्न पडला. कारण सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्ष ज्या तयारीने आला होता त्याच मुद्द्यावर अजित पवार यांनी ताबोडतोब निर्णय घेतला होता.
दरम्यान आज विधान भवनात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या खेळीची चर्चा चांगलीच रंगली होती. अजित पवार हे आपल्या सडेतोड स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. आज विरोधकांनाही त्याचा चांगलाच अनुभव आला. विधान भवन मुख्य प्रवेशद्वार आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत दोन्ही सभागृहात वीजबील दरवाढ आणि कट केलेले वीज मीटर कनेक्शन यावरच आक्रमकपणे गोंधळ घालण्याची रणनीती आखून सर्व भाजप आमदार सभागृहात आले होते. त्यानुसार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वीज दरवाढ आणि तोडलेले वीज मीटर कनेक्शन यावर सरकारवर हल्ला चढवायला सुरुवातही केली. समोर सत्ताधारी बाकांवर बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे शांतपणे ऐकले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उर्जामंत्री नितीन राऊत उत्तर देतील असे सर्वांना वाटत असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी वेळीच उत्तर देऊन खवळलेल्या भाजप आमदारांना शांत केले आणि आपसूकच गदारोळ थांबला.