माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचा जामीन रद्द करावा, शासनाच्या वतीने खंडपीठात अर्ज, दोन आठवड्यानंतर होणार सुनावणी

औरंंगाबाद : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात वाहन नेऊन पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणात एक वर्षाची शिक्षा झाल्यानंतर जामिनावर सुटलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा संबंधित जामीन रद्द करावा, यासाठी शासनाच्या वतीने सोमवारी (दि.२२) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल करणयात आला. सुनावणीदरम्यान न्या. मंगेश पाटील यांनी हर्षवर्धन जाधव यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर ठेवण्यात आली आहे.
शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जानुसार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणात शिक्षा झाल्यानंतर पुन्हा असे कृत्य न करण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला होता. मात्र, जाधव यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य घडले आहेत. त्याआधारे जाधव यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून यासंदर्भातील नोटिसीत जामीन का रद्द करू नये, असे म्हटले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ५ जानेवारी २०११ रोजी वेरूळच्या पर्यटन केंद्रामध्ये होणाऱ्या शासकीय बैठकीसाठी औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानिमित्त मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुर्यकांत कोकणे हे आपल्या पथकासह खुलताबाद इदगाट टी पॉईटजवळ बंदोबस्तावर तैनात असतांना त्यांच्या अंगावर गाडी घातली होती. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. यावेळी आ.जाधव यांनी महिला कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी कोकणी यांच्या तक्रारीवरुन खुलताबाद पोलिस ठाण्यात आ.जाधव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.