AurangabadNewsUpdate : औरंगाबाद शहरात २३ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत संचारबंदी

गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने जिल्हाप्रशासनासह पोलिस दल सतर्क झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग संपविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी केले आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात २३ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने गेल्या वर्षभरापासून औरंगाबाद शहरात धुमाकुळ घातला असून डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ च्या अखेरीस कोरोना संसर्गाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या दोन आकडी संख्येवर आली होती. त्यात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या १५ ते २० दिवसात झपाट्याने वाढ झाली असून आजघडीला जिल्ह्यात ९४७ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाप्रशासन आणि पोलिस दल सतर्क झाले आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमात नागरिकांनी गर्दी करू नये, मास्कचा वापर कटाक्षाने करावा, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी केले आहे.
दरम्यान, शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात अनावश्यक फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणाऱ्यांवर आणि मास्कचा वापर न करणाऱ्या रिक्षाचालकावरही दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत पोलिस आयुक्त डॉ.गुप्ता यांनी यावेळी दिले आहेत.
वर्षभरात २६५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना विषाणूच्या संसर्गाने शहर पोलिस दलातही शिरकाव केला असून गेल्या वर्षभरात शहर पोलिस दलातील २६५ अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होऊन कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी यावेळी दिली. तीन दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचा कोव्हीड चाचणीचा अहवाल आल्यानंतरच यावर भाष्य करणे योग्य ठरेल असे त्यांनी सांगितले.
शहरात ८० वाहने घालणार गस्त
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून संचारबंदीला सुरूवात करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, मेडिकल, दवाखाने, कंपन्या यांना सुट देण्यात आली आहे. संचारबंदीसाठी जवळपास ८० दुचाकी आणि चारचाकी वाहनांद्वारे शहरभर गस्त घालण्यात येणार असून गरजेप्रमाणे वाहनांची संख्या वाढवण्यात येईल असे पोलिस आयुक्त डॉ.गुप्ता यांनी स्पष्ट केले.
प्रतिबंधित बाबी
– पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र जमण्यास मनाई.
– अत्यावश्यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधित राहतील.
या बाबींना मुभा
– सर्वप्रकारचे वैद्यकीय सेवा (हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल)
– औद्योगिक कारखाने चालू राहतील (कारखान्यातील कामगार व मालवाहतूक चालू राहणार)
– अत्यावश्यक सेवा-सुविधा सुरू राहतील.
– पेट्रोल पंप सुरू राहतील.
– माल व माल वाहतूक चढण-उतरण सेवांना परवानगी
– कॉल सेंटर, कार्यालये, टॅक्सी, कार, ऑटो, ट्रान्सपोर्ट बसेस यांना परवानगी