18 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात 7 वर्षांपूर्वी (2014) 18 महिन्यांच्या चिमुकलीवर एका व्यक्तीने बलात्कार केला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या निर्णयाला ऐतिहासिक सांगत सरकारी वकील म्हणाले, की यामुळे समाजात एक कठोर संदेश जाईल आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्यास मदत होईल.
2014 साली देहात कोतवाली ठाण्याच्या क्षेत्रात एका गावात 18 महिन्यांच्या चिमुकलीला गावातीलच एका व्यक्तीने तिच्या घरुन उचलून नेले होते. यानंतर त्याने मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. घटना उघड होऊ नये यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह तलावात फेकून दिला होता. याप्रकरणी भरपूर तपास आणि शोधाशोध केल्यानंतर गावातील लोकांना तिचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु होती. अशात सोमवारी अखेर हरदोईच्या अप्पर सत्र आणि जिल्हा न्यायालयाच्या कोर्ट नंबर 14 मधून ऐतिहासिक निर्णय सुनावण्यात आला. याप्रकरणी संबंधित व्यक्ती आरोपी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा आणि दोन लाखाचा दंड ठोठावण्यात आला.
सरकारी वकील रामचंद्र राजपूत यांनी सांगितले, की न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे समाजात योग्य आणि कठोर असा संदेश जाणार आहे. यामुळे अशा कृत्याचा विचार करतानाही एखादा व्यक्ती शंभर वेळा विचार करेल आणि त्याच्या मनात एक भिती निर्माण होईल.