खलिस्तान जिंदाबादच्या कार्यकर्त्याला केले गजाआड

पंजाब येथील अमृतसरमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला नांदेड येथून अटक करण्यात आली. पंजाब पोलीस आणि नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत त्याला त्याब्यात घेतले.
गुरपिंदरसिंग संतासिंग उर्फ ग्यानी असे त्याचे नाव असून पंजाब राज्यातील ता. गुरुसर जिल्हा मुक्तसर येथील तो रहिवाशी आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर करून प्रवासी रिमांडवर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. खलिस्तान जिंदाबाद संघटनेच्या चार जणांविरुद्ध बंदीचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी एकजण नांदेड येथे असल्याची गुप्त माहिती पंजाब राज्य पोलीस दलाला मिळाली होती. त्या अनुषंगाने पंजाब पोलीस नांदेड येथे आले होते. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने नांदेड तहसील कार्यालयांच्या परिसरात आरोपीला 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.05 वाजता ताब्यात घेतले.