आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. काँग्रेस नेते मंत्री अशोक चव्हाण यांनी “हा शेतकऱ्यांचा अपमान आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संयुक्त किसान मोर्चाने आम्हाला आंदोलनजीवी असण्यावर गर्व असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हटले आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे की, “होय आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय जवान जय किसान!” तसेच त्यांनी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिल्ली-उत्तरप्रदेश गाझीपूर बॉर्डरवर राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. तसेच संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट करत, “गर्वसे कहो…हम सब आंदोलनजीवी हैं. जय जवान. जय किसान!” असेही म्हटले आहे.
होय
आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे..
जय जवान
जय किसान! pic.twitter.com/3CysKqFrtH— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2021
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, “आंदोलनजीवी शब्दाचा वापर शेतकऱ्यांचा अपमान आहे. तसेच त्यांनी ट्वीट करताना म्हटले आहे की, “पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही ‘जीवी’ नाही, तर मानवतेला ‘जीवि’त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे.”
पंतप्रधानांचा 'आंदोलनजीवी' हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही 'जीवी' नाही, तर मानवतेला 'जीवि'त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे.
— Ashok Chavan (@AshokChavan1958) February 8, 2021
संयुक्त किसान मोर्चाने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “संयुक्त किसान मोर्चा पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या केलेल्या अपमानाची निंदा करतो. शेतकरी पंतप्रधानांना आठवण करुन देऊ इच्छितात की, ते आंदोलनजीवीच होते, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. त्यामुळेत आम्हालाही आंदोलनजीवी असण्यावर गर्व आहे. ते भाजप आणि त्यांचे वंशज आहेत, ज्यांनी कधीकाळी इंग्रजांच्या विरोधात आंदोलने केली नाहीत. ते नेहमी जन आंदोलनांच्या विरोधात होते. त्यामुळेच ते आताही जन आंदोलनांना घाबरत आहेत.
दरम्यान, राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर सादर करण्यात आलेल्या आभार प्रस्तावावर चर्चेवेळी उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी ‘आंदोलनजीवी’ या शब्दाचा वापर केला होता. पंतप्रधानांनी कृषी कायद्यांवरील सुधारणांवर ‘यु-टर्न’ घेण्यास काँग्रेसलाही खडे बोल सुनावले. ते म्हणाले, आम्ही ‘बुद्धीजीवी’ हा शब्द ऐकला होता. परंतु आता काही लोकं ‘आंदोलनजीवी’ झाले आहेत. देशात काहीही झाले की ते त्या ठिकाणी पोहोचतात. कधी ते पडद्याच्या मागे असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून वाचायला हवे ,”जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचे आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही,” असेही मोदी म्हणाले.