हप्ता वसुली : ११ पोलिसांना दणका; परभणीच्या पोलीस अधीक्षकांची धडाकेबाज कारवाई

‘सदरक्षणाय , खल निग्रहणाय ‘ हे आपले ब्रीद आणि कर्तव्य विसरून अवैध मार्गाने हप्ता वसुली आणि अनैतिक कार्य करणाऱ्या ११ पोलिसांना परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबनाची कारवाई करीत दणका दिला आहे. आधी माजी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनीही अशाच 4 जणांना निलंबित तर एकाला बडतर्फ केले होते. दरम्यान उपाध्याय गेल्यानंतर आलेल्या नूतन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनीही हे कारवाईचे सत्र सुरूच ठेवत तब्बल 11 जणांना निलंबित केले असल्याचे वृत्त आहे.
उपलब्ध माहितीनुसार परभणी जिल्ह्यात एकुण 19 पोलीस ठाणे आहेत. यातील बहुतांश ठाण्यातील काही कर्मचारी थेट अवैध दारू विक्री, अवैध धंदे चालक यांच्या सतत संपर्कात असतात. त्यांच्याकडून कारवाई न करण्याचे पैसे घेतात. महत्वाचे म्हणजे इतर अधिकारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती ही या गुन्हेगारांना अशा पोलिसांकडून दिली जाते. त्यातच जिल्ह्यात फोपावलेल्या अवैध वाळु उपसा करणाऱ्या वाळू तस्करांकडूनही यातील काहीजण हफ्ते घेत होते. जे पोलीस अधीक्षकांच्या कारवाईत निष्पन्न झाले आहे.
मानवतचा एक कर्मचारी अवैध दारू, गुटखा विक्री करणाऱ्यांकडून पैसे घेत होता. सेलुचा एका कर्मचाऱ्याने परितक्त्या महिलेशी संबंध ठेवले होते. निराधार महिलेला संरक्षण देण्याऐवजी तिच्या एकटेपणाचा फायदा घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पुर्णा पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी वाळू तस्करांकडून हप्तेवसुली करीत होता. तर कोतवाली पोलीस ठाण्याचे आठजण वाळू तस्कर आणि अवैध धंदे करणारांकडून हप्ता वसुली करीत होते.