#FarmerTractorRally : ट्रॅक्टर रॅलीच्या हिंसक वळणाने शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट

प्रजासात्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या दिवशी हिंसाचार झाला. या प्रकरणी अनेक शेतकरी नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या आंदोलनात फूट पडतांना दिसत आहे. दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीचे समन्वयक व्हीएम सिंग यांनी शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, भारतीय किसान यूनियन संघटनेने (भानू) देखील आंदोलनातून माघार घेतली आहे.
शेतकरी नेते व्हीएम सिंग यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची संघटना शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रीय किसान मजदूर संघ असे व्ही.एम. सिंग यांच्या संस्थेचे नाव आहे. ही संघटना यापुढे आंदोलनाचा भाग होणार नाही. व्हीएम सिंह म्हणाले की, आंदोलन अशाप्रकारे चालणार नाही. आम्ही येथे हुतात्मा करण्यासाठी किंवा लोकांना मारहाण करायला आलेलो नाही. त्यांनी भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्यावर आरोप केले आहेत. व्हीएम सिंग म्हणाले की, राकेश टिकैत सरकार यांच्या भेटीला गेले होते. यूपीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी एकदा तरी उपस्थित केला का? त्यांनी एकदा तरी धानाविषयीचर्चा केली का? ते कशाबद्दल बोलत होते. आम्ही येथूनच समर्थन देत राहिलो आणि तिथे कोणीतरी नेते बनले, हा आमचा व्यवसाय नाही, असे व्हीएम सिंह म्हणाले.
दरम्यान, व्ही. एम. सिंग यांच्या पाठोपाठ भारतीय किसान युनियन(भानू)चे प्रमुख ठाकूर भानू प्रताप सिंह यांनीही या आंदोलनातून बाजूला होण्याची घोषणा केली. भानू प्रताप सिंह यांनी काल लाल किल्ल्यावर ध्वज फडकवण्याच्या प्रकाराचा निषेध केला. तसेच भारताची तिन्ही सुरक्षा दले, बीएसएफ या सर्वांबाबत आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले आणि आंदोलनात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपली संघटना या आंदोलनातून बाजूला होत असल्याची घोषणा केली.