#FarmerTractorRally : दिल्लीतील घटनेला सरकारचा अहंकार जबाबदार – संजय राऊत

दिल्लीत आज घडलेल्या घटनांचे कोणी समर्थन करू शकत नही पण, ‘शेतकऱ्यांना भेटायचे नाही, शेतकऱ्यांची माथी भडकवायची आणि देशभर वणवा पसरवायचा. तसेच त्याचा राजकीय फायदा घ्यायचा, असे काही षडयंत्र सध्या सुरू असल्याचा संशय मला वाटत आहे. आजचा हिंसाचार सरकारला थांबवता आला असता. सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
दुपारी दिल्लीच्या रस्त्यावर जो नजारा दिसला तो ना आंदोलकर्त्यांना शोभतो ना सरकारला. गेल्या 2 महिन्यात शांतीपूर्ण आंदोलन सुरू होते. असे शिस्तबद्ध आंदोलन संपूर्ण विश्वात नाही झाले. संयमाने सुरू असलेल्या आंदोलनात अचानक काय झाले की आंदोलक आक्रमक झाले? सरकार या दिवसाची वाट पहात होती का? 3 कृषी विरोधी कायद्याचा हा प्रश्न आहे. ‘ज्या कायद्यापासून लोक खुश नाही त्या कायद्याचा काय उपयोग? कोणासाठी हे कायदे बनवले आहेत? सरकार शेतकरीविरोधी कायदा रद्द का करत नाही? असे प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केले.
दर्यान, आज दिल्लीच्या रस्त्यावर अराजकता पसरली. शेतकऱ्यांना खालिस्तानी, अतिरेकी म्हणून माहोल बिघडवला जात आहे. आज हे व्हायला नको होते. सरकारने याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाजूने आहे, पण आजच्या घटनेची निंदा केली पाहिजे पण माहोल बिघडण्यासाठी सरकारचा अहंकार जबाबदार आहे. यामुळे संपूर्ण देशाचा माहोल बिघडू शकतो. हजारो शेतकरी मुंबईत आले पण परिस्थिती बिघडू दिली नाही. मुंबईत अशी घटना झाली असती तर उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचा राजीनामा मागितला असता. आता याबाबत कोणाचा राजीनामा मागितला जाईल?’ असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.