जनावरांची चोरी करणारी टोळी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

औरंंगाबाद : जनवारांची चोरी करणाऱ्या तीन आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी शुक्रवारी (दि.२२) कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेर गफुरखान कुरैशी, अंन्सार शेख मुसा शेख, तुषार उर्फ सनी अशोक दिवेकर, सर्व रा. देवगाव रंगारी अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जनावरे चोरी करणाऱ्यांची बनावटची नावे आहेत. तुषार जाधव ( रा. डोणगाव रोड, लासुर स्टेशन, ता.गंगापुर) यांच्या डोणगाव रोडवरील हॉटेलसमोरून ३० डिसेंबरच्या रात्री एक गाय आणि वासरू चोरट्यांनी चोरून नेले होते. तसेच गावातील विनोद शेलार यांची एक गाय, सोमनाथ वाकळे यांच्या घरासमोरून कालवड चोरून नेली होती. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उप निरीक्षक संदीप सोळंके, पोलिस अंलदार विठ्ठल राख, दिपेश नागझरे, संजय भोसले, योगेश तरमाळे, रामेश्वर धापसे, जीवन घोलप आदींनी तांत्रिकदृष्ट्या तपास करीत जुबेर गफुरखान कुरैशी याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने जनावरे चोरी केली असल्याची कबूली दिली. पोलिसांनी या टोळीच्या ताब्यातून जनावरे विक्रीतून आलेली रोख रक्कम ३० हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली पिकअप व्हॅन, तीन मोबाइल असा एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.