IndiaCoronaVaccineUpdate : काय आहे देशातील लसीकरणाची अवस्था ? किती जणांना झाला साईड इफॆक्ट ?

देशात सुरु करण्यात आलेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २,२४, ३०१ जणांना लस देण्यात आली. यापैकी केवळ ४४७ जणांना साईड इफेक्ट झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार जगात सर्वाधिक लसीकरण भारतात झालं आहे. एका दिवसात २,०७, २२९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सपेक्षा ही संख्या जास्त आहे.
दरम्यान लसीकरणानंतर ४४७ जणांवर त्यांचे साईड इफेक्ट झाल्याचे दिसून आले आहे. परंतु यापैकी फक्त तिघांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं. रविवार असल्याने केवळ सहा राज्यांनी करोना व्हायरस लसीकरण मोहीम हाती घेतली आणि ५५३ केंद्रांमध्ये एकूण १७,०७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. रविवारी लसीकरण मोहिमेत सहाभागी झालेल्या सहा राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि मणिपूर आणि तामिळनाडूचा समावेश आहे, अशी माहिती मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी दिली.
देशात लसीकरण दररोज होणार नाही. कारण यामुळे इतर आरोग्य सेवांवर परिणाम होत होता. हे लक्षात घेता, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना (यूटी) नियमित आरोग्य सेवांमधील अडचणी कमी करण्यासाठी आठवड्यातून चार दिवस कोरोनावरील लसीकरण सत्र आयोजित करण्याचा सल्ला देण्यात आला, असं डॉ. अग्नानी म्हणाले.
२,२४,३०१ लाभार्थ्यांना लस
१७ जानेवारी पर्यंत एकूण २,२४,३०१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी, लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी (शनिवारी) २,०७,२२९ जणांना लस देण्यात आली.’१६ आणि १७ जानेवारी या दोन दिवसांत लसीकरणाचे एकूण ४४७ जणांवर साईड इफेक्ट दिसून आले. पण त्यापैकी फक्त तिघांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. आतापर्यंत, इतर बहुतेकांमध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या यासारख्या आरोग्याशी संबंधित लहान समस्या दिसून आल्या, असं ते म्हणाले.