CoronaIndiaUpdate : ब्रिटन -भारत दरम्यान ३० विमानांना ये – जा करण्यास परवानगी , केजरीवाल यांचा मात्र विरोध

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. या नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने ब्रिटनहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. इतकेच नव्हे तर याच कारणावरून प्रजासत्ताक दिनाला येणारे ब्रिटनचे पंतप्रधान यांचा दौराही रद्द झाला मात्र विमान बंदीची तारीख संपताच आता ब्रिटनहून २४६ प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान राजधानी दिल्लीत दाखल झालं आहे. भारताने कोरोना सुरक्षेच्या कारणास्तवर ब्रिटनसोबतची विमानसेवा बंद केली होती. २३ डिसेंबरला बंद करण्यात आलेली ही सेवा नुकतीच सुरु करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मात्र विरोध केला आहे.
Centre has decided to lift the ban and start UK flights.
In view of extremely serious COVID situation in UK, I wud urge central govt to extend the ban till 31 Jan
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 7, 2021
दरम्यान भारतात सध्या करोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेले ८२ रुग्ण आहेत. त्यातच बुधवारी भारताने पुन्हा एकदा विमानसेवा सुरु केली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठवड्याला ३० विमानांचं उड्डाण होणार आहे. यामध्ये भारतातून १५ आणि ब्रिटनमधून १५ उड्डाणं असतील. २३ जानेवारीपर्यंत अशाच पद्धतीने सेवा सुरु राहील अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. दिल्ली विमानतळावर ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना आपल्या शहरात जाण्यासाठी पुन्हा विमानाने प्रवास करताना किमान १० तासांचा वेळ ठेवावा अशी सूचना केली आहे.
कोरोनाची भीती लक्षात घेता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बंदी अजून वाढवावी अशी मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “केंद्राने ब्रिटनमधील विमानांवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील गंभीर परिस्थिती पाहता ही बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवावी अशी माझी केंद्राला विनंती आहे. खूप परिश्रम घेतल्यानंतर करोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. ब्रिटनमधील परिस्थिती गंभीर आहे. ही बंदी उठवून आपण आपल्या लोकांचा जीव धोक्यात का घालत आहोत?”. विशेष म्हणजे दिल्लीत करोनाच्या नव्या प्रकाराचे १३ रुग्ण सापडले आहेत. ८ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना करोना टेस्टचे पैसे स्वत: भरावे लागणार आहेत. याशिवाय प्रवाशाच्या ७२ तास आधीचा करोना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. निगेटिव्ह असल्यानंतरही प्रवाशाला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार आहेत.