WorldNewsUpdate : अमेरिकेत उदंड झाली लोकशाही , ट्रम्प समर्थकांचा संसदेत घुसून हिंसाचार , ४ ठार

राष्ट्राध्यक्षपदाच्या वादावरून अमेरिकेत गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून हिंसाचार केला आहे. अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा होणार होती. त्याच वेळेस ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. या हिंसाचारातएका महिलेसह चार जण ठार झाल्याचे वृत्त हाती आहे. नंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसीच्या महापौरांनी स्थानीक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहिल असे आदेश दिलेत.
Disgraceful scenes in U.S. Congress. The United States stands for democracy around the world and it is now vital that there should be a peaceful and orderly transfer of power.
— Boris Johnson (@BorisJohnson) January 6, 2021
विशेष म्हणजे ट्रम्प यांनी आपला पराभव अद्यापही मान्य केला नाही. सत्तेवर राहण्यासाठी सर्व मार्ग अवलंबणार असल्याचेही त्यांनी याआधी स्पष्ट केले. दरम्यान अमेरिकन संसदेत जो बायडन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात येणार होती. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिल बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी इमारतीत घुसखोरी केली. यामुळे संसदेत एकच गोंधळ निर्माण झाला. सुरक्षितेच्या दृष्टीने सिनेट सभागृहाचे दरवाजे सुरक्षितपणे बंद करण्यात आले. खासदारांना सुरक्षितेच्या दृष्टीने लष्कराच्या एका छावणीत नेण्यात आले.
हिंसाचार थांबविण्यासाठी रोखल्या बंदुका
मावळते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे समर्थक कॅपिटल हिल इमारतीबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. त्यावेळी त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. अनेक ट्रम्प आंदोलक संसदेत घुसण्यात यशस्वी झाले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अमेरिकेतील स्थानिक वेळ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एरिजोना राज्यातील इलेक्टोरल मतदानाच्या मुद्यावर चर्चा सुरू होती. त्याच वेळी ट्रम्प समर्थक संसदेत घुसले असून सिनेट सभागृहाच्या बाहेर असल्याचे खासदारांना समजले. त्यानंतर ही चर्चा थांबवण्यात आली. ट्रम्प समर्थकांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे या ट्रम्प समर्थकांना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना बंदुका रोखाव्या लागल्या.
जो बायडन यांनी तीव्र प्रतिक्रिया
या घटनेवर निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा विरोध नसून देशद्रोह आहे अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. “कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न मानणाऱ्यांची ही छोटी संख्या आहे…हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे”, असे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचं ट्विटर-फेसबुक अकाउंट ब्लॉक
दरम्यान या घटनेनंतर फेसबुक आणि ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ट्विटर आणि फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट ब्लॉक केलं आहे. हिंसाचार सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीबाबात केलेल्या निराधार आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली. ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट बारा तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केले आहे. नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला.