MaharashtraCoronaUpdate : राज्यात ४ हजार ३८२ नवीन रुग्णांचे निदान , ६६ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज कोरोनाने आणखी ६६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत या आजाराने ४९ हजार ८२५ जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे. आज राज्यात ४ हजार ३८२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ५७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ५२ हजार ७५९ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३१ लाख ३४ हजार १९ इतक्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ५४ हजार ५५३ (१४.८८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३३ हजार ८७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ५२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ४ हजार ३८२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ५७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत आज नवीन बाधितांचा आकडा जास्त असल्याने चिंतेत काहीशी भर पडली आहे. दरम्यान, राज्यातील रिकव्हरी रेट सध्या ४५ टक्क्यांच्या उंबरठ्यावर आहे तर मृत्यूदर २.५५ टक्के इतका आहे.
राज्यात नवीन कोरोनाचे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यातील तीन रुग्ण अन्य राज्यांतील असल्याचे स्पष्ट झाल्याने व हे आठही रुग्ण लक्षणे विरहित असल्याने तूर्त मोठा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाची साथ अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाच्या आकडेवारीत सातत्याने चढउतार होत आहे. दैनंदिन करोनामुक्त रुग्णांचा आकडा १० हजारावर गेल्यानंतर पुन्हा त्यात मोठी घट झाली आहे तर दुसरीकडे नवीन बाधितांचा आकडा चार हजारच्या वर गेला आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा ५० हजारच्या खाली आला होता. मात्र हा आकडा पुन्हा ५० हजारच्या वर गेला आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात ५० हजार ८०८ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यात सर्वाधिक १३ हजार १३० रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात १० हजार ६५६ रुग्णांवर उपचार सुरू असून मुंबई पालिका हद्दीत ही संख्या ७ हजार ४८४ पर्यंत खाली आली आहे.