औरंगाबाद नामांतर प्रकरण : रामदास आठवलेंनी ट्विट केले काढून टाकले !!

औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप -शिवसेनेत चांगलाच वाद रंगला आहे . या वादात काँग्रेस- राष्ट्रवादी बरोबर रामदास आठवले यांनीही शड्डू ठोकले होते मात्र एकाच दिवसात आठवले यांनी या वादातून माघार घेत संभाजीनगरवरून केलेले ट्विट काढून टाकले आहे . दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली असून काँग्रेसने याला विरोध केला आहे. यावरुन भाजपाने शिवसेनेला टार्गेट केले आहे. दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या रामदास आठवले यांच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली होती . मात्र, काही वेळाने त्यांनी ट्विट डिलीट करत नामांतरणाच्या मुद्द्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान येत्या काळात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर शहराचे नाव बदलण्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेसने याला विरोध केला आहे. यावरुन भाजपाने शिवसेनेवर शरसंधान साधले असून निवडणुकीपुरतीच शिवसेना ही भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. यावरून भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईंच्या रामदास आठवले यांनी रविवारी आपलाही औरंगाबादच्या नामांतराला विरोध असल्याचं ट्विट केलं. मात्र, काही वेळातच त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं.
काल त्यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत औरंगाबादच्या नामांतरणामुळे वाद होऊन महाविकास आघाडी सरकार पडेल त्यामुळे या नामांतरणाच्या वादात या सरकारने पडू नये असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला होता . औरंगाबादचे नामांतर करायचं होतं तर पूर्वी सरकार होतं त्यावेळी का केलं नाही असा सवाल यावेळी रामदास आठवले यांनी उपस्थित केला होता. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारने तयार केलेल्या तीनही कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे समर्थन करून शेतकरी आंदोलन करत असले तरी हे तीनही कायदे मागे घेणे शक्य नाही प्रत्येक कायद्याला विरोध होत असतो मात्र ते कायदे मागे घेतल्यास संविधान धोक्यात येईल असं मत दिल्लीत कृषी विधेयकं विरोधात सुरू असलेल्या कायद्यांवर व्यक्त केले.