एमबीबीएसच्या विद्याथ्र्याची आत्महत्या

घाटीत एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणा-या विद्याथ्र्याने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. १ जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
यश नरसिंगराव गंगापूरकर (वय २२, मुळ रा. नांदेड, ह. मु. ब्राम्हण गल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्याथ्र्याचे नाव आहे. यश गंगापुरकर हा गेल्या दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. बेगमपुरा भागातील ब्राम्हण गल्लीत तो बहिण व आईसोबत राहायचा. २५ डिसेंबर रोजी त्याने आई व बहिणीला साबण आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. त्यानंतर काही वेळाने तो देखील घराबाहेर पडला. मात्र, तोपर्यंत त्याची आई व बहिण घरी आली होती. घराबाहेर गेलेल्या यशने विषारी औषध सेवन केल्यानंतर घर गाठले. त्यावेळी अचानक उलटी झाल्याने दोघींना संशय आला. त्यांनी यशला तात्काळ घाटीत दाखल केले. घाटीत उपचार सुरू असताना त्याला गारखेडा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, बेगमपुरा पोलिसांनी त्याचा जवाब नोंदविण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. अखेर शुक्रवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजकुमार जाधव करत आहेत.