स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळल्याने ८ लोकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर स्मशानभूमीत सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळल्याने सुमारे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, १८ लोकांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही लोक ढिगाऱ्यात अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
गाजियाबाद: मुरादनगर में बारिश की वजह से छत गिरी, क़रीब 10-12 लोगों के फंसे होने की आशंका है। बचाव अभियान चल रहा है। pic.twitter.com/1WUHO5MLys
— ANI_HindiNews (@AHindinews) January 3, 2021
आज सकाळपासूनच दिल्ली आणि एनसीआरमध्ये पाऊस पडत आहे. दरम्यान, मुरादनगर येथील स्मशानभूमीत काही जण एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांसाठी आले होते. पाऊस पडत असल्याने लोकांनी स्मशानातील शेडचा आधार घेतला होता. मात्र त्याचदरम्यान या शेडचे छप्पर अचानक कोसळले आणि त्याखाली अनेकजण दबले गेले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्रभावी पद्धतीने बचावकार्य चालवण्याचे निर्देशही आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
उखलारसी गावातील एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात आला असल्याचे वृत्त आहे. या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना उपस्थित लोकांनी शताखाली आश्रय घेतला होता. त्याचवेळी स्मशानमधील शेडचे छप्पर कोसळून सुमारे २० ते २५ जण त्याखाली अडकले. यामधील ८ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.