केंद्र सरकारची महत्वाची घोषणा… भारतात करोनाची लस मिळणार मोफत – आरोगमंत्री डॉ. हर्षवर्ध

संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची तयारी सुरू आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला असून, देशातील सर्व लोकांना करोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केली आहे.
दरम्यान, देशातील सर्वच नागरिकांना करोनाची लस मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. करोनाच्या प्रति हर्ड इम्युनिटी विकसित व्हावी आणि करोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी आवश्यक तेवढ्याच लोकांना करोनाची लस टोचली जाणार आहे. मात्र, ज्यांना करोनाची लस टोचली जाईल त्यांना एकही पैसा द्यावा लागणार नसल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोणाला लस टोचायची आहे याबाबत सरकार निश्चिती करत असून पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांना लस टोचली जाणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, करोना योद्धे, ५० वर्षांहून अधिक वय असलेले नागरिक आणि इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचा समावेश असेल.
लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील करोना लशीबाबत अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. लशीची सुरक्षा आणि तिचा योग्य उपयोग करून घेणे ही आमची प्राथमिकता असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. पोलिओ उन्मूलनासाठी लशीकरणाच्या वेळी देखील अनेक प्रकारच्या अफवा पसरलेल्या होत्या. मात्र लोकांनी लस घेतली आणि आता भारत पोलिओमुक्त झालेला असल्याचेही ते पुढे म्हणाले.