IndiaNewsUpdate : शेतकरी आंदोलक संघटना आणि सरकार यांच्यात पुन्हा मंगळवारी चर्चा

मोदी सरकारने अखेर शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवला असून त्यानुसार २९ डिसेंबर रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता आंदोलक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि शासन यांच्यात चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान या बैठकीत मोदी सरकारने तयार केलेले तिन्ही कृषीविषयक कायदे रद्द करण्यात यावेत आणि एमएसपी ला कायदेशीर दर्जा देण्यात यावा या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्याचबरोबर वायू गुणवत्ता आणि विद्युत संशोधन बिलावरही या बैठकीत चर्चा व्हावी असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे . संयुक्त शेतकरी मोर्चानेही याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवला आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केंद्र शासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की , शासनाच्या वतीने आम्ही दिलेल्या प्रस्तावानुसार चर्चा करण्यास आमची तयारी आहे . आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की शेतकरी संघटना खुलेपणाने शासनाशी चर्चा करण्यास आधीही तयार होत्या , आताही तयार आहेत आणि पुढेही राहतील.
विशेष म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोलक संघटना आणि सरकार यांच्यामध्ये सहा वेळा बैठका , चर्चा झाल्या आहेत परंतु त्यातून काहीही साध्य झालेले नाही . तरीही दोन दिवसांपूर्वी ही शासनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चा करण्याचा प्रस्ताव पाठवला असून या प्रस्तावावर चर्चा करण्याची शेतकऱ्यांनी तयारी दर्शवली आहे . आंदोलनामध्ये आता चाळीस संघटनांचा सहभाग आहे.