EducationNewsUpdate : दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे निकाल आज होताहेत जाहीर तर CBSE बोर्डाची परीक्षा लांबणीवर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल हा आज बुधवारी लागणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. गुणपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी २४ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दुपारी १ वाजता हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आणि mahresult.nic.in इथेही पाहता येतील.
दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर
दरम्यान, २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं, असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं सरळ डेटा बेसमध्ये २३ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१ दरम्यान अर्ज भरता येणार आहे. तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांना १२ जानेवारी ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान प्रचलित पद्धतीनं ऑनलाइन अर्ज भरू शकतील.
राज्यात कोरोनाच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनानं लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्यामुळे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे निकाल जुलै २०२० मध्ये जाहीर करण्यात आले होते. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याकडून परीक्षा अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतही परीक्षा मंडळानं सूचना दिल्या आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं,असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
आचार्य देवो भव: Interacting with teachers on upcoming board exams. #EducationMinisterGoesLive @EduMinOfIndia @SanjayDhotreMP @PIB_India @MIB_India @DDNewslive https://t.co/SSNzSkkV4f
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank ( Modi Ka Parivar) (@DrRPNishank) December 22, 2020
CBSE बोर्डाची परीक्षा लांबणीवर
दरम्यान कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा धोका जगभरातील अनेक देशात निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातही अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. अशातच CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबतही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
कोरोना काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत सुरुवातीपासूनच संभ्रम होता. मात्र 3 डिसेंबर रोजी या परीक्षेबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी वेगळीच माहिती दिली होती. ‘2021च्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन नाही तर लेखी परीक्षा घेण्यात येतील. याबाबत अद्याप चर्चा सुरू असून बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच त्याही तारखा जाहीर केल्या जातील,’ असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) सांगण्यात आले होते.