IndiaNewsUpdate : देश : अयोध्येतील मंदिराच्या भूमिपूजनंतर प्रजासत्ताकदिनी भव्य मशिदीची पायाभरणी , उभारली जातेय बाबरीपेक्षाही मोठी मशिद

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर त्या जागेवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळाही पार पडला . दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनुसार अयोध्येत मशिदीसाठी देण्यात आलेल्या पाच एकर जमिनीवर बाबरी मशिदीपेक्षाही भव्य मशीद निर्माण करण्यात येत असून शनिवारी या कामांची ब्लू प्रिंट सादर करण्यात येणार आहे. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी या मशिदीचा पायाभरणी सोहळा आयोजित करण्यात आला आली आहे. मशिदीसोबतच या पाच एकर जागेवर भव्य रुग्णालय, नर्सिंग आणि पॅरामेडिकल महाविद्यालया, कम्युनिटी किचन, भव्य वाचनालय आदी सुविधा उभारल्या जाणार आहेत. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टचे सचिव अथर हुसैन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अथर हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्येत मशीद बांधण्यासाठी इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (आयआयसीएफ) ची एक महत्त्वाची बैठक १९ डिसेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत जे सदस्य वैयक्तिकरित्या लखनऊला दाखल होऊ शकणार नाहीत त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी करून घेण्यात येणार आहे. ट्रस्टच्या सदस्यांव्यतिरिक्त आर्किटेक्ट्सदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीनंतर सायंकाळी ४.०० वाजता एका पत्रकार परिषदेद्वारे मशिदीच्या रचनेबाबत विस्तृतपणे माहिती देण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी ९ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक निर्णय सुनावताना वादग्रस्त जागा राम मंदिर समितीकडे सोपवतानाच केंद्र सरकारला मशिदीसाठी पाच एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सरकारकडून मशिदीसाठी अयोध्येतील साहोवाल तहसीलच्या धन्नीपूर गावातील पाच एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाकडे सोपवण्यात आली होती. ६ डिसेंबर १९९२ ला कार सेवकांनी विवादित बाबरी मशीद पडली होती.
भव्य रुग्णालय आणि महाविद्यालय
जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाचे मुख्य आर्किटेक्ट एस एम अख्तर यांच्याकडून या प्रकल्पाच्या योजनेला अंतिम स्वरुप देण्यात आलं आहे. बाबरी मशिदीपेक्षा या नव्या मशिदीची रचना वेगळी असेल. तसंच बाबरी मशिदीपेक्षाही ही मशीद अत्यंत भव्य असेल. अख्तर यांच्या म्हणण्यानुसार, एकावेळी दोन हजार लोक नमाझासाठी या मशिदीला एकत्र जमू शकतील. दरम्यान अयोध्या मशिदीच्या संकुलात उभं राहणारं रुग्णालय ईस्लामच्या खऱ्या भावनेतून जनसेवा करणार आहे. या रुग्णालयाची रचना मशिदीसारखीच असेल. त्यावर इस्लामिक प्रतिके आणि सुलेखांचाही वापर केला जाईल. एकावेळी ३०० रुग्ण सामावून घेऊ शकेल, एव्हढं हे रुग्णालय असेल. या रुग्णालयात डॉक्टर रुग्णांवर मोफत उपचार करतील. सौरऊर्जेचा वापर करताना हे मशिद संकुल ऊर्जेसाठी स्वयंपूर्ण असेल. तसेच यात नैसर्गित तापमान मेन्टेनेन्स सिस्टमचाही वापर करण्यात येणार आहे.
देणगीदारांसाठी अद्याप ८० जी मंजुरी नाही
याशिवाय याच परिसरात एक नर्सिंग आणि पॅरामेडिकल महाविद्यालयाची स्थापना करण्यात येऊ शकते. त्यामुळे रुग्णालयासाठी नर्स आणि इतर स्टाफ कधीही अपुरा पडणार नाही. रुग्णालयासाठी डॉक्टरांची व्यवस्था फैजाबादमधून होऊ शकेल. तसंच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी विशेष परिस्थितीत अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहता येऊल, जे इथे आपली सेवा देऊ इच्छितात. मशिदीच्या कम्युनिटी किचनमध्ये दिवसातून दोन वेळा चांगलं भोजन मिळू शकेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. इथे येणाऱ्या गरीब जनतेच्या पोषणाच्या गरजा याद्वारे भागवण्याचा प्रयत्न केला जाईल. या सर्व कामांसाठी अनेक दात्यांनी देणगी देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, यासाठी अद्याप ८० जी मंजुरी मिळालेली नाही. त्यानंतर एफसीआरए आणि मूळ भारतीय मुस्लिमांकडून परदेशी फंडच्या स्वरुपात दान स्वीकारलं जाईल, अशी माहितीही आयआयसीएफ सचिवांनी दिली आहे.