MaharashtraNewsUpdate : कुंडली पाहणारे आता पुस्तक वाचत आहेत , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधकांना उत्तरे

गेल्या ५ वर्षात कुंडल्या पाहणारे आता पुस्तक वाचत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. राज्य सरकारने तरी दोन दिवसांच अधिवेशन घेतलं. केंद्र सरकारनं तर हिवाळी अधिवेशन रद्द केलं आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीका करत विरोधकांची तोंड बंद केली. कोरोना कानात नाही तर नाकात बोलतो, अशा शब्दांत विरोधकांना टोला लगावला. दरम्यान माझं कुटुंब माझी जबाबदारी देशातील एकमेव मोहिम आहे. महाराष्ट्रचा आरोग्याचा नकाशा तयार आहे. मृतांची संख्या आपण लपवलेली नाही. आपण जगासमोर सत्य तेच सांगितलं आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात सांगून विरोधकांची बोलती बंद केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले कि , मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं आहे. आज त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलही भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची लढाई अंतिम टप्प्यात पोहचली आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी वकिलांची फौज आली आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकेल हा विश्वास मला आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय व्हावं असं मला वाटतं मला वाटतं की ही सुधीर मुनगंटीवार यांचीही हीच इच्छा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी हसत हसत म्हटलं. त्यावर नाना पटोले यांनी आमच्या मित्राच्या मागे का लागता असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही इथेच थांबा तुम्ही कुठे जाऊ नका. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. येत्या काही वर्षांमध्ये प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठीही काम करणार आहोत. यासाठी आम्ही निधीही राखून ठेवणार आहोत. यावरुन तुमच्या हे लक्षात येईल की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी जाहीर झाली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे. “महाराष्ट्रात काही सरकारविरोधात काही बोललं तर तुरुंगात टाकलं जातं, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्याला नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती. किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या. हे सगळं काय आहे? ही विकृतीच आहे. असं विकृत राजकारण आम्ही करत नाही” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्ले ही आपली ओळख आहे, हा प्रदेश देवदेवतांचा साधुसंतांचा आहे. प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार काम करेल. त्यासाठी वेगळा निधी राखून ठेवला जाईल. टप्प्याटप्प्यानं यांचं संवर्धनाचं काम केलं जाईल. या ठेव्याचं जतन केलं जाणार आहे. विशेष म्हणजे ते वाढवलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, विरोधाकांच्या सगळ्या आरोपांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. गेल्यावेळी आपण सगळे एकत्र होतो. आपण वकिलांची फौज जशीच्या तशी तयार ठेवली आहे. मराठा संघटनाशी देखील चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण हे वकिलांच्या संपर्कात आहेत. इतर समाजाचे आरक्षण कमी करणार का, अशी चर्चा काही सडक्या डोक्यातून आली आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. कोणाचंही आरक्षण कमी करणार नाही, अशा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं बोलत असल्याचंही त्यांनी सभागृहात सांगितलं.